Ganam
Kasara By Aaishwary Patekar
Kasara By Aaishwary Patekar
मातीच जर नष्ट झाली
तर कविता लिहिण्याचं कारणच आपोआप संपुष्टात येईल
या ओळी आहेत ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘कासरा’ कवितासंग्रहातील. बैल गाडी ओढतात आणि कासरा मालकाच्या हातात असतो. मालकाने मूठभर वैरण न टाकता, निगा न राखता बैलाचे अतोनात शोषण करावे; तशी आजची नवी भांडवली व्यवस्था कृषिजनसमूहाचे शोषण करत आहे, हे ही कविता आवर्जून नोंदवते. हा कवी गाव, माती, गावगाडा या साऱ्याचे वर्तमान आपल्यापरीने तपासत, अन्वय लावत त्याची यथासांग चिकित्सा करतो. कृषिजन संस्कृतीच्या गाभ्यातील ताणतणाव या कवितेच्या केंद्रभागी आहेत. त्यामुळेच तो, ‘मी माझ्यात अख्खं गाव घेऊन फिरतोय’ असं संग्रहाच्या सुरुवातीच्या पानावरच नोंदवतो.
‘खाऊजा’ धोरण स्वीकारल्यानंतर महानगर बुलडोझरसारखं खेड्यात घुसलं आणि खेडं अगतिक बनत गेलं. खेड्याच्या मूल्यव्यवस्थेला तडे जाऊ लागले. खेडी बकाल बनत गेली. उद्ध्वस्त कृषिजनसमूहाचा आलेखच ही कविता आपल्यासमोर मांडते. ही कविता आजच्या खेड्यापाड्यातील वर्तमान जगण्याला दिलेली तीव्र प्रतिक्रिया आहे. याचा अर्थ ही प्रतिक्रियावादी कविता आहे; असे मात्र नाही. ती सखोल चिंतनगर्भ कविता आहे. अत्यंत सहज-सुलभ वावरणारी लय आणि नव्या शब्दांची निर्मिती, ही या कवितेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या कवितेत प्रतिमा, प्रतीकांना फारशी जागा नाही. कारण ही कविता जगण्यातील अस्सलतेचा स्वर आहे. आजच्या कृषिजन संस्कृतीचा विद्रूप चेहरा, ही कविता अधोरेखित करते. म्हणून या कवितेचे मोल अधिक आहे. या कवितेत वाचणाऱ्याला घेरून टाकत अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य आहे. हेच या कवितेचे बलस्थान आहे.
— राजन गवस
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.