Ganam
Hiravee Portrets By Purushottam Berde
Hiravee Portrets By Purushottam Berde
हिरवी पोर्ट्रेट्स' हा ललित लेखसंग्रह म्हणजे कोकणच्या अंत:स्पंदनांची रम्य स्मरणयात्रा. बेर्डेंमधला लेखक - दिग्दर्शक - चित्रकार - नेपथ्यकार - पार्श्वसंगीतकार - जाहिरात कलाकार - वाद्यवृंदकार कसा घडत गेला, नावारूपाला आला, याचीही प्रेरणादायक कहाणी या ललित गद्यामधून आपल्याला कळते. कोकणची भूमी अनेक कलावंतांची जन्मदात्री आहे. संगीत, नृत्य, अभिनय, दिग्दर्शन, चित्र, शिल्प अशा अनेकविध क्षेत्रांत कोकणपुत्रांनी व कोकणकन्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. स्वतंत्र प्रज्ञा, जिद्द, उद्यमशीलता, साहसीपणा, एखादं काम अत्यंत चिकाटीने पूर्णत्वास नेण्याची आकांक्षा, श्रद्धाशीलता या गुणांमुळे आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा राष्ट्रीय स्तरावर उमटविणारे अनेक गुणीजन कोकणभूमीत निर्माण झाले. आपले भूमिसंस्कार घेऊन स्वत: वाढत राहिले. राष्ट्र, समाज, संस्कृती, धर्म, विविध कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, राजकारण, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रांत या कर्तृत्ववान माणसांनी जे योगदान दिले; त्याचे `हिरवी पोर्ट्रेट्स'मधून अंशत: दर्शन घडते. हे लेखन केवळ `कोकण प्रशंसापुराण' नाही. त्यातील आत्मचिकित्सा, समाजचिकित्सा, अंतर्मुखता, वास्तव निरीक्षणे आणि समकाळाशी जोडून घेण्याची सकारात्मकता लक्षणीय आहे. `हिरवी पोर्ट्रेट्स'मधल्या व्यक्तिचित्रांना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या सर्वस्पर्शी कलाभानामुळे दृश्यमानता लाभली आहे. `पोर्ट्रेट'मध्ये Location, Lighting, Composition, Emotion, Technical Settings हे पाच घटक महत्त्वाचे असतात. बेर्डे यांनी यात ध्वनी (Sound) हा आणखी एक घटक मिसळवून या सगळ्याचे एकजीव रसायन केले आहे आणि त्यामुळे ही व्यक्तिचित्रे जिवंत वाटतात. ही सगळी जमिनीशी जोडलेली माणसे आहेत. कोकणभूमीशी घट्ट नातेसंबंध असलेली आहेत. त्यांचे यथार्थ चित्रांकन करताना बेर्डे यांनी जे सामाजिक आणि सांस्कृतिक भान ठेवले आहे, त्यामुळे या ललित लेख / व्यक्तिचित्र संग्रहाची मूल्यात्मकता वाढलेली आहे. डॉ. महेश केळुसकर
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.